वाल्मी येथील रोजगार सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा
छत्रपती संभाजीनगर :
राज्यातील लाखो बेरोजगार अभियंते आणि युवकांची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारला ठोस इशारा देत काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की—जोपर्यंत जलसंधारण विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही, तोपर्यंत जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही!
वाल्मी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे भव्य ‘रोजगार सत्याग्रह’ आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस व रोजगार विभागाचे संयोजक धनंजय शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष युसूफ शेख यांनी केले.
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा दीपालीताई मिसाळ, प्रदेश सचिव प्रकाश भगनुरे पाटील, प्रदेश सचिव प्रवीण केदार, प्रमोद सोनवणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारने वारंवार घोषणा करून बेरोजगारांची दिशाभूल केली असून प्रत्यक्षात एकही जाहिरात, आकृतीबंधाचा निर्णय किंवा भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित शेकडो बेरोजगार अभियंत्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाल्मीच्या आयुक्त डॉ. अंजली रमेश यांना निवेदन सादर केले. आकृतीबंध तातडीने मंजूर करणे आणि सर्व रिक्त पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली.
आयुक्त डॉ. रमेश यांनी,
“सदर मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून राज्य सरकारशी तातडीने चर्चा करू; निर्णयाबाबत बेरोजगारांना माहिती देण्यात येईल,”
असे आश्वासन दिले.
काँग्रेसने स्पष्ट केले की—युवकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांना आता जिल्ह्यात स्थान राहणार नाही.

