पुणे : मेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा, शहरातील अंतर्गत रिंग रोड आदी पायाभूत सुविधांना सरकारने गती द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली.पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी प्रमुख मागण्या मांडल्या. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील खराडी- हडपसर -स्वारगेट- खडकवासला, नळ स्टॉप- वारजे- माणिकबाग हे मार्ग तसेच रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, सिव्हिल कोर्ट ते लोणी काळभोर अशा विस्तारित कामांना जमीन संपादनासह गती मिळावी, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
पुण्याभोवतीच्या रिंग रोडसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा आणि निधी वाढवून मिळावा. शहराची अंतर्गत वाहतूक सुरळीत होण्यासाठी जमीन संपादन आणि वेगवेगळ्या परवानग्या मिळविण्याच्या कामाला वेग यावा, अशीही सूचना शिरोळे यांनी आज केली.
शिवाजीनगर एसटी टर्मिनस हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे, तो तातडीने पूर्ण करण्यात यावा. रेंज हिल रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण तातडीने व्हावे, अशाही मागण्या शिरोळे यांनी केल्या.
नवीन मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या धर्तीवर पुण्याचे नवीन पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास तातडीने सुरूवात करावी, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षभराच्या काळात मुंबई कोस्टर रोड, मुंबई ट्रान्स हार्बल लिंक-अटल सेतू, समृद्धी महामार्ग, नव्या मेट्रो लाईन्स, नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्ग, वधवन पोर्ट अशा अनेक प्रकल्पांनी राज्याच्या विकासाचा वेग बदलून टाकला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा सर्वांगीण विकास यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ठामपणे सांगितले.

