पुणे-माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे कि , माझा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि त्यामुळे कलमाडी यांनी सुरु केलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची फाईल २०१९ नंतर फाईलची गुंडाळी करण्यात आली ,२०२४ ला अधिकाऱ्यांनी एकतर्फी मार्ग बदलला जो चुकीचाच आहे . पुणे-नाशिक नवीन रेल्वे मार्गात अचानक केलेल्या बदलावर गंभीर आक्षेप घेतला आहे. हा बदल चुकीचा असून, यामुळे प्रवासाचा वेळ वाढणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून विषय समजावून सांगणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मार्ग बदलला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला
आढळराव पाटील यांच्या मते, हा रेल्वे मार्ग आता चाकणऐवजी २६ मीटर रस्त्याच्या दिशेने वळवला जात आहे. यामुळे खेड-शिरूर भागाचे मोठे नुकसान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा प्रकल्प आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता आणि २००५ पासून आपण त्याचा पाठपुरावा करत असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम ही मागणी लावून धरली होती. २०१६ मध्ये या प्रकल्पाचा खर्च २,४०० कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता, ज्यात केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी अर्धा खर्च उचलणार होते. २०१९ मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली आणि ९०० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमिनींसाठी दिली गेली, मात्र त्यानंतर २०१९ नंतर फाइल थंड बस्त्यात पडल्याचे आढळराव म्हणाले.
२०२४ मध्ये पुन्हा पाठपुरावा सुरू केल्यावर रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांनी एकतर्फी मार्ग बदलल्याचे समोर आले. शिर्डी जोडण्यासाठी मार्ग बदलत असल्याचे सांगितले जात असले तरी, शिरूर-रांजणगाव-नगर मार्गे शिर्डीचा जुना रस्ता आधीच अस्तित्वात आहे. नवीन मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक असून, मूळ मार्ग सर्वांना सोयीचा होता, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समस्या वाहतूक कोंडी असताना रेल्वे आणि हायवे सुविधा अपुऱ्या आहेत. खेड येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक कारणांमुळे शक्य नव्हते, तरी त्याचे खापर आपल्यावर फोडले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“विमानतळ नाही, रेल्वे नाही, हायवे दयनीय अवस्थेत आहे, मग या भागातील जनता कुठे जायची? सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशारा आढळराव पाटील यांनी दिला.

