महाराष्ट्र सरकारने राज्यात सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी यासाठी मी दिनांक 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे.
पुणे -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी लोकायुक्तांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धीतील यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अण्णांनी तपोवनातील वृक्षतोडीलाही विरोध दर्शवला आहे.
नाशिक येथील वृक्ष तोडीवर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावीत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात लोकाआयुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आपण उपोषण करणार असल्याचे सांगत उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. राज्य सरकाकडून लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात ते उपोषण करणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक शहरात विकासकामांचा धडाका सुरू असताना, तपोवन परिसरातील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राचा प्रकल्प आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने 300 हून अधिक डेरेदार झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या बेसुमार वृक्षतोडीमुळे तपोवनातील जैवविविधता आणि नैसर्गिक समतोल ढासळण्याची भीती व्यक्त केली जात असून, पर्यावरणवाद्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे साधुग्राम परिसरातील 1800 झाडांच्या कत्तलीचा वाद अद्याप प्रलंबित असतानाच, आता नवीन एसटीपी प्लांटसाठी झालेली ही वृक्षतोड आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने आपली बाजू मांडताना, या प्रकल्पासाठी 447 झाडे तोडण्याची अधिकृत नोटीस दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या दाव्यानुसार, मंजूर संख्येतील 300 झाडे तोडण्यात आली असून उर्वरित झाडे वाचवण्यात यश आले आहे. मात्र, प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतरही पर्यावरणप्रेमींचे समाधान झालेले नसून त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पायाभूत सुविधांची कामे वेगाने मार्गी लावली जात असली, तरी त्याला पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींनी घेतली आहे. हिरवाईने नटलेल्या तपोवनसारख्या भागात अशा प्रकारे झाडांची कत्तल झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान भरून न येणारे असल्याने, प्रशासनाने विकासासोबतच निसर्ग संवर्धनाचे भान राखावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
अण्णा हजारे यांचे पत्र वाचा जसेच्या तसे ………….
दिनांक- 08/12/2025
जा.क्र.- 23/2025-26
प्रति,
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई- 32
विषय- महाराष्ट्र सरकारने राज्यात सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी यासाठी मी दिनांक 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करीत असलेबाबत..
महोदय,
राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा यासाठी 23 मार्च 2018 रोजी दिल्लीच्या रामलिला मैदानावर सात दिवसांचे उपोषण करण्यात आले आणि त्यानंतर 30 जानेवारी 2019 रोजी राळेगणसिद्धीच्या यादबबाबा मंदिरात सात दिवसांचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर आपण कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पाच सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे पाच सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन करून सदर समित्याच्या 9 बैठका होऊन लोकायुक्त कायद्याचा मुसदा तयार करण्यात आला.
28 डिसेंबर 2022 रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर 15 डिसेंबर 2023 रोजी राज्याच्या विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. 20 डिसेंबर 2024 रोजीच्या आपल्या पत्रात सदर लोकायुक्त विधेयकास राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली आहे आणि सदर विधेयक मा. राष्ट्रपती महोदयांच्या मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा शासन करत आहे असे पत्रात नमुद केले आहे. परंतू आपण पाठवलेल्या पत्राला एक वर्षा पेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधानपरिषदेमध्ये मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.
कारण हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. त्यामुळे मी विचार केला की, हार्ट अटॅकने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन. म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की, आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये दिनांक 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करीत आहे.
आपला,
कि. बा. तथा अण्णा हजारे

