पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने त्याला कात्रज घाटात बोलावून साथीदारांच्या मदतीने धमकावले आणि 10 हजार रुपये लुटले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुण भूगाव परिसरात राहतो. त्याची समाजमाध्यमातून एका तरुणीशी ओळख झाली होती, जी नंतर वाढली. 7 डिसेंबर रोजी तरुणीने त्याला फोन करून कात्रज घाटात फिरायला जाण्याची विनंती केली. तरुण आपल्या दुचाकीवरून कात्रज घाटात पोहोचला, जिथे ती तरुणी त्याच्यासोबत दुचाकीवर बसली.काही अंतरावर अंधारात तरुणीचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी तरुणाला अडवून धमकावले आणि त्याला कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात दुचाकी घेऊन जाण्यास सांगितले. येवलेवाडीत तरुणाला मारहाण करण्यात आली.
तरुणीने त्याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तिने तरुणाकडे 70 हजार रुपयांची मागणी केली. तरुणाकडे तेवढी रक्कम नसल्याने, त्याच्याकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने घेण्यात आले. पैसे घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. या प्रकाराने पीडित तरुण भयभीत झालेला होता. त्यामुळे त्याने घडलेल्या घटनेची कुठे वाच्यता केली नाही.मात्र, पैसे दिल्यानंतरही तरुणाला उर्वरित रक्कम देण्यासाठी आरोपी यांच्याकडून सतत धमक्या येत होत्या. या सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. पसार झालेल्या तरुणीसह तिच्या साथीदारांचा शोध सुरू असून, सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत.

