बँकॉकहून आलेल्या तस्करास अटक
पुणे – येथील विमानतळावर अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करत एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एका प्रवाशाला अटक करून तब्बल २ कोटी २९ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बँकॉकहून परतणाऱ्या या प्रवाशाने चतुराईने बॅगमध्ये हा अमली पदार्थ लपवून आणला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा साठा विमानतळावरच हेरून पकडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी इंडिगोच्या 6E-1096 या विमानाने बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाबाबत शंका निर्माण झाली. एअर इंटेलिजन्स युनिटने तपासणीदरम्यान त्याचे वर्तन संशयास्पद आढळल्याने त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. त्याचे सामान उघडून सूक्ष्म तपासणी केल्यावर दोन बंद पिशव्यांमध्ये ठेवलेला २ हजार २९९ ग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. नियंत्रित, कृत्रिम शेती पद्धतीत तयार होणारा हा गांजा अत्यंत तीव्र आणि महागडा असल्याने अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ठ केले. सापडलेल्या मालाबाबत प्रवाशाला विचारणा केली असता तो अडखळू लागला. पुढील चौकशीत अखेर त्याने हा माल स्वतःसोबत आणल्याची कबुली दिली.
उच्च नशेचा हायड्रोपोनीक गांजा नेमका असतो कसा
“हायड्रोपोनिक गांजा’ म्हणजे पारंपरिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या मातीचा वापर पूर्णपणे टाळून हायड्रोपोनिक्स या विशिष्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाढवलेला गांजा होय. हायड्रोपोनिक्स म्हणजे “जल-संवर्धन’ पद्धत. या तंत्रात गांजाच्या रोपाला आवश्यक असणारी सर्व खनिजे आणि पोषक तत्त्वे मातीऐवजी थेट पाण्यात विरघळवून तयार केलेल्या पोषक द्रावणातून दिली जातात. ही लागवड सामान्यतः पूर्णपणे बंद आणि कृत्रिम वातावरणात केली जाते, जिथे तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साइडची पातळी आणि एलईडी दिव्यांच्या मदतीने मिळणारा प्रकाश हे सर्व घटक रोपाच्या वाढीनुसार अचूकपणे नियंत्रित केले जातात. नियंत्रित वातावरणामुळे या गांजातील टीएचसी (नशा आणणारा घटक) चे प्रमाण पारंपरिक गांजापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते, ज्यामुळे तो अत्यंत तीव्र बनतो. तसेच माती नसल्याने कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरण्याची गरज कमी होते, त्यामुळे हा गांजा उच्च शुद्धतेचा मानला जातो.

