परभणी :सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करत आहे. हिंदू समाजाविरोधात मस्ती करणारे दोन पायांवर आपल्या घरी जाणार नाही हे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले. रोहिला पिंपरी गावात २१ ऑक्टोबरला दोन गटांत फटाके फोडण्यावरून हाणामारी झाली होती. या घटनेतील जखमी मारोती डुकरे यांचा ६ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी १० डिसेंबरला मंत्री नितेश राणे परभणीत आले होते. मंत्री नितेश राणे परभणी शहरातून परत जात असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रायगड कॉर्नर परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. पेडगाव रोडवरील एका कुटुंबाची राणे यांनी भेट घेतली. त्यानंतर नांदेडकडे जाताना काही युवकांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
याआधी नितेश राणेंनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये
१७ एप्रिल : देशात मुस्लिम ३५-४० टक्क्यांवर पोहोचले असतील तर ते १० टक्क्यांवर कसे येतील ते पाहा, आम्ही इथे बसलो आहोत, हवा तिथे भगवा फडकवा, तुम्हाला काही होणार नाही.
८ जुलै : गोल टोप्या व दाढी असलेल्यांनी मला मतदान केले नाही, मी हिंदूंच्या मतांनी आमदार.
५ डिसेंबर : तपोवनातील वृक्षतोडीला विरोध, मग बकरी ईदला बकरे कापायला का नाही?

