नागपूर, दि. १० डिसेंबर २०२५ :
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सुयोग विश्रामगृह येथील पत्रकार निवासस्थानी भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. विविध सामाजिक प्रश्न, महिला संरक्षणाची गरज, वाढते गुन्हे, न्यायप्रक्रियेतील अडचणी आणि स्वतःच्या सार्वजनिक आयुष्यातील अनुभवांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
संवादादरम्यान महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, सायबर क्राईम, अल्पवयीन मुलींचे प्रश्न, ऊसतोड मजुरांची स्थिती आणि सामाजिक ढाच्यातील बदल यावर डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अनेक महिला प्रकरणांमध्ये स्वतः पीडितांकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यावरच पुढील निर्णयाचे निर्देश देत असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलींना निर्णयक्षम वयात पोहोचल्यावर त्यांच्याकडे शिक्षण, आश्रय, विवाह किंवा स्वतःच्या निवडीचे पर्याय खुले ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
फलटणमधील वैद्यकीय क्षेत्रातील आत्महत्येप्रकरणी हातावर लिहून ठेवलेल्या माहितीचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की अशा घटनांमधून सामाजिक दबाव, भावनिक अत्याचार आणि महिलांवरील संकल्पनागत अन्यायाचे गांभीर्य दिसून येते. समाजाने आणि प्रणालीने अधिक संवेदनशीलतेने अशा प्रकरणांकडे पाहण्याची गरज आहे.
आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सामाजिक कामातून सुरुवात करून शिवसेना पक्षातील जबाबदाऱ्या, 2002 मध्ये विधान परिषदेवर निवड, त्यानंतर मिळालेली विविध पदे आणि 2020 मध्ये उपसभापतीपद – या सगळ्या टप्प्यांनी त्यांना सातत्याने कार्याची ऊर्जा दिली. “माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने आणि सभागृहाने संधी दिली; त्या संधींचा उपयोग समाजहितासाठी करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
महिलांवरील गुन्हे वाढत आहेत याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की सायबर गुन्ह्यांपासून ते प्रत्यक्ष अत्याचारांपर्यंत सर्व गुन्ह्यांची नोंद वाढतेय, हे केवळ गुन्हे वाढताहेत म्हणून नाही तर समाजात जागरूकता वाढल्यानेही लोक पुढे येऊ लागले आहेत. शहरीकरण, स्थलांतर आणि बदलत्या सामाजिक रचनेचा गुन्हेगारीवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संवादासाठी विधिमंडळ मान्यताप्राप्त पत्रकारांसह विविध माध्यमांतील वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

