पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना हा सवाल उपस्थित केला आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना सध्या अटक करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, पार्थ पवार यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचे पाहायला मिळत होते. आता मुंबई उच्च न्यायालयानेच पार्थ पवारांचे नाव का नाही असा सवाल उपस्थित केल्याने प्रकरणी नवे वळण मिळणार असल्याचे दिसत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात मुंढवा जमीन प्रकरणी सुरू असलेल्या जमीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असा थेट सवाल केला. दरम्यान, याप्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. शीतल तेजवानीने बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर, हायकोर्टाकडून अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही, असा थेट सवाल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, सामान्य जनतेच्या मनात असलेला प्रश्न शेवटी न्यायमूर्ती जामदार यांनी वकिलांना विचारला. 1800 कोटींची सरकारची जमीन तुम्ही आम्ही घेतली असती, तर आपल्याला पहिल्याच दिवशी उचलून तुरुंगात टाकले असते. पण एक महिना उलटून गेल्यानंतरही एफआयआरमध्ये देखील पार्थ पवारांचे नाव नाही. त्यांच्या पार्टनरला चौकशीला बोलावूनही, तो हजर होत नाही. हे काय चाललंय? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, पण आज शीतल तेजवानी या हायकोर्टात जामिनासाठी गेल्या होत्या. त्यावर तुम्ही सेशन कोर्टात जाण्याऐवजी हायकोर्टात का आलात? अशी विचारणा तेजवानीला केली. त्यावर आम्ही सेशन कोर्टात गेलो, पण नोटरी इशू आल्यामुळे आम्ही हायकोर्टात आलो. यावर जस्टीस जामदार अतिशय चिडले आणि सदरील याचिका मागे घ्या, अन्यथा तुमच्यावर प्रचंड दंड लावण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती दमानिया यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेल्या मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणात, पुणे पोलिसांनी मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवून तेजवानीची दोन वेळा सखोल चौकशी केली होती, ज्यात तिचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर शीतल तेजवानीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

