पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या सदाबहार गीतांच्या सादरीकरणातून पुणेकरांची सायंकाळ ‘एक हसीन शाम’ ठरली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘अलविदा वीरू..’ या विशेष कार्यक्रमाचे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्व. धर्मेंद्र यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेली अजरामर गीते आघाडीच्या गायिका मनिषा निश्चल यांच्यासह जितेंद्र पेठकर, सतीश मराठे यांनी सादर केली. स्वप्नील पोरे यांचे निवेदन होते.
‘आपके हसीन रुख़ पे’, ‘मैं कहीं कवि ना बन जाऊ’, ‘झिलमिल सितारों का आँगन होगा’, ‘छलकाये जाम आइये’, ‘ना जा कहीं अब ना जा’, ‘तू मेरा मैं तेरी दुनिया जले तो जले’, ‘यही है तमन्ना तेरे दर’, ‘साथिया नहीं जाना’, ‘देखा है तेरी आँखों में’, ‘एक हसीन शाम को’, ‘गर तुम भुला ना दोगे’, ‘हुई शाम उनका ख्याल आ गया’, ‘ये दिल तुम बिन कहीं’ आदी लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
या प्रसंगी धर्मेंद्र स्मृती विशेषांकाचे तसेच ‘जिंदगी कैसी है पहेली हाये’ या मंदार जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे, ज्येष्ठ लेखिका सुलभा तेरणीकर, संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर, धमेंद्र मानसपुत्र महेश नामपूकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीस डॉ. किशोर सरपोतदार यांनी सांगितीक उपक्रमाविषयी माहिती दिली. या प्रसंगी ज्योत्स्ना सरदेशमुख, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, कवी राजन लाखे, शरयू जोशी, कवयित्री मीरा शिंदे, आनंद सराफ, मनिष गोखले आदी मान्यवर उपस्थित होते

