पुणे-“वोट चोरी हे देशातील विदारक सत्य असून लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा भाजपाचा कुटील डाव आहे. लोकांचा एकमताचा अधिकार हिरावून घेणे म्हणजे नागरिकांना दिलेल्या सर्वोच्च शक्तीचा अपमान आहे. भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्म, महिला-पुरुष यांना समान मताधिकार दिला आहे. परंतु भाजपा-आरएसएस या शक्तीला कमकुवत करून ठराविक लोकांसाठीच सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. वोट चोरी हे त्यांच्या अनेक हत्यारांपैकी एक असून, लोकशाहीला पोकळ करण्याच्या षड्यंत्राचा तो मोठा भाग आहे.” अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. कॉंग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा – कर्तव्य – त्याग’ सप्ताहात आयोजित “लोकशाहीची हत्या – वोट चोरीचे विदारक सत्य” या प्रदर्शनास बालगंधर्व कलादालन येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते.
महत्वपूर्ण आणि मार्मिक निरीक्षणे नोंदवत सपकाळ यांनी प्रदर्शनातील तथ्यपूर्ण मांडणीचे कौतुक केले. प्रारंभी या सप्ताहाचे संयोजक व या प्रदर्शनाचे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्य्क्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “वोट चोरी हा केवळ निवडणूक विषय नाही; तो लोकशाहीच्या अस्तित्वाशी निगडित गंभीर प्रश्न आहे.”
प्रदर्शनाचे आयोजक, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, “भारतीय संविधान, लोकशाहीची मूल्ये व मताधिकार ही आपल्या प्रजासत्ताकाची ताकद आहे. पण हीच ताकद कमी करण्यासाठी आरएसएस आणि भाजपा विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. वोट चोरी हा लोकशाहीचा गळा घोटणारा सर्वात धोकादायक प्रयोग आहे.”
याप्रसंगी माजी नगरसेवक अविनाश बागवे, सुनील मलके, लता राजगुरू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे, अॅडवोकेट शाबीर शेख, इंटक्स च्या अध्यक्ष चेतन अग्रवाल, अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील मलके यांनी केले.

