पुणे, १०डिसेंबर २०२५ :
पुणे महानगरपालिकेच्या पुणे बाल महोत्सवचा चौथा पर्व ११ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान सारसबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव आता शहरातील पालक व लहान मुलांसाठी अत्यंत आवडता कार्यक्रम ठरला असून, दरवर्षी १ लाखाहून अधिक पालक व बालक विविध उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित राहतात.यंदा उत्सवाचा विषय आहे “लेस स्क्रीन, मोर प्ले” (कमी स्क्रीन, अधिक खेळ), ज्यामध्ये पालकांच्या आरोग्य व कल्याणावर विशेष भर देण्यात आला आहे – हा बालविकासातील महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक आहे. या कार्यक्रमाचा उद्देश मुलांच्या तसेच पालकांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.
बालकांच्या आयुष्यातील सुरुवातीची वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. पहिल्या पाच वर्षांत त्यांच्या संज्ञानात्मक, सामाजिक व मोटर कौशल्यांचा झपाट्याने विकास होतो. या विषयावरील जनजागृती वाढविण्याची व पालकांना मुलांच्या विकासासाठी विविध मार्गांची माहिती देण्याची तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज ओळखून दरवर्षी शहरात हा बाल महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या उत्सवात बालविकास क्षेत्रात कार्यरत ३० हून अधिक संस्था व भागीदार सहभागी होऊन कुटुंबांसाठी माहितीपूर्ण, खेळकर व संस्मरणीय अनुभव निर्माण करणार आहेत. अनेक रोचक खेळ, खेळावर आधारित उपक्रम, गोष्टी सांगणे, प्रत्यक्ष अनुभव देणारी चर्चा सत्र, मुलं आणि पालकांनी एकत्रितपणे मजा घेण्यासाठी आखणी करण्यात आली आहे. हा उत्सव कुटुंबांसाठी एक रोमांचक अनुभव ठरणार आहे.
आपले शहर झपाट्याने वाढत आहे आणि या वाढत्या शहरात डिजिटल युगात जन्माला आलेली नवीन पिढी व त्यांचे पालक राहत आहेत. या वेगाला शहरातील पालक कसे सामोरे जात आहेत याचा जाणीवपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे . त्याचा पालकत्वाच्या पद्धतीत सकारात्मक बदल झाला आहे का, की पालक पूर्वीपेक्षा अधिक थकलेले आणि दमलेले वाटत आहेत? यावर्षीच्या बाल महोत्सव मध्ये एक केअर पॅव्हिलियन असेल, जे पालकांना त्यांच्या स्वतःच्या जगात डोकावण्याची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करता येईल हे समजून घेण्याची संधी देईल, ज्यामुळे ते आपल्या मुलांसाठी अधिक चांगले पोषक ठरतील. पुणे हे नर्चरिंग नेबरहूड्स २.० उपक्रमांतर्गत ‘डीप डायव्ह सिटी’ आणि अर्बन ९५ लाईटहॉउस सिटी असून, शहर नियोजन व विकासामध्ये पालकांच्या कल्याण व बालकेंद्रित दृष्टिकोन समाविष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. हा उपक्रम गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पाठिंब्याने, व्हॅन लिअर फाउंडेशनच्या सहकार्याने व WRI इंडिया यांच्या तांत्रिक मदतीने राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील चालू व आगामी प्रकल्पांमध्ये या दृष्टिकोनाचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन, शहराने बालक-पालक मेळावे परिसरातील उद्यानांमध्ये आयोजित करून पालक व मुलांमधील संवाद वाढविण्याचे प्रभावी मार्ग दाखवले आहेत व अशा मैदानी उपक्रमांना शहरात हळूहळू नित्याचा भाग बनवले आहे.
आजच्या काळात पालक व्यस्त दिनचर्या सांभाळत असताना व मुले घरात अधिक वेळ घालवत असताना, हा उत्सव सक्रिय, स्क्रीन-मुक्त सहभाग व सकारात्मक पालकत्वाचे महत्त्व अधोरेखित करतो. कुटुंबे, तज्ज्ञ व संस्था यांना एकत्र आणून पुणे बाल महोत्सव पुण्यातील लहान नागरिकांसाठी अधिक निरोगी व आनंदी सुरुवात घडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
११ ते १४ डिसेंबर २०२५ पर्यंत सारसबाग येथील आयोजित बाल उत्सव या कार्यक्रमास सहभागी व्हा असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

