पुणे, दि. १० डिसेंबर २०२५
दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका – खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
नवीन थार वाहन कोकणाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून वाहन सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळले, आणि सहाही तरुणांचा मृत्यू झाला. मृतक सर्व तरुण अत्यंत गरीब, वंचित आणि कष्टकरी कुटुंबांतील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबांवर अपरिमित आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट कोसळले आहे.
माता–वडील आजही धुणे–भांडी, घरकाम, मजुरी, बिगारी अशा अल्प उत्पन्नाच्या कामांवर कसेबसे उदरनिर्वाह करत असताना घरातील एकमेव कर्त्या तरुणांचा मृत्यू त्यांच्या अस्तित्वावरच आघात करणारा ठरला आहे. ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित नसून अत्यंत दुर्बल, वंचित आणि उपेक्षित कुटुंबांवर आलेले गंभीर आयुष्यनिर्वाहाचे संकट आहे.
आज महाराष्ट्र विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात Point of Information या सत्रात माध्यमातून खडकवासला मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची दखल घेण्याची मागणी शासनाकडे केली.
आमदार तापकीर यांनी सभागृहात पुढील दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या—
१) मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीची, अर्थपूर्ण व समर्पक आर्थिक मदत जाहीर करावी
भूतकाळात शासनाने अनेक दुर्घटनांमध्ये मानवी, संवेदनशील आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन ठेवून मदत जाहीर केली आहे.
त्या परंपरेनुसार या सहा कुटुंबांना तातडीने आर्थिक दिलासा मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
२) ताम्हिणी घाटातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात
धोकादायक वळणे सुरक्षित करणे, संरक्षण भिंती उभारणे, चेतावणी फलक, कॅट-आय रिफ्लेक्टर, सुरक्षा जाळी, वेगमर्यादा नियंत्रण आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल सुधारणा करणे या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आमदार तापकीर म्हणाले—या सहा तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबांचा संपूर्ण भविष्याचा आधारच कोसळला आहे. शासनाच्या हस्तक्षेपामुळे या दुर्बल कुटुंबांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

