पुणे, दि. १० : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग ११ वर्षांपासून “डायल १०८ रुग्णवाहिका” राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे १ कोटी १४ लाख ४७ हजार २९६ रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.
सद्यस्थितीत राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस.) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस.) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील २४ तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.
राज्यात ५ डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये १०८ रुग्णवाहिकेमधून ५,४४,२२४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील ३१,९२७, हृदयरोगातील १,०३,८८९, उंचावरून पडून जखमी झालेल्या १,५९,५५१, विषबाधेच्या २,६७,४७४, प्रसूतीवेळीच्या १७,९६,६५५ आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या ७,३९९ रुग्णांना सेवा देण्यात आली.
अशा प्रकारे राज्यात १०८ सेवेमार्फत एकूण १ कोटी १४ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात यश आले आहे.
विदर्भातील गोंडवाना विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या विभागातील १ लाख ३८ हजार ६६५ नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
“१०८” रुग्णवाहिका ठरली ४१,५१६ बालकांचे जन्मस्थळ-महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णवाहिकेत ४१,५१६ बालकांचा जन्म झाला आहे. तसेच १७ लाख ९५ हजार २९२ गर्भवती महिलांना यशस्वी सेवा देण्यात आली आहे.
थोडक्यात, १०८ रुग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अमृतवाहिनी ठरत आहे.
सर्पदंश झालेल्या १,१९,८२४ रुग्णांचे प्राण वाचवले-राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सर्पदंश झालेल्या १ लाख १९ हजार ८२४ नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यात ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरीवर्गाचा समावेश आहे.

