पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी शुक्रवारी रुग्णालयाची तोडफोड केली. हडपसर येथे असलेल्या सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील सपकाळ यांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयात तोडफोड केली. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या दर्शनी भागातील काचा कचऱ्याचा स्टीलचा डबा आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने फोडण्यात आल्या. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला होता. यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले.
या सगळ्याबाबत शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख आहे. माझ्याबाबत ही गोष्ट असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल. माझ्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात अल्सरचं ऑपरेशन होणार होतं. ही फक्त दोन टाक्यांची साधी शस्त्रक्रिया होती. मात्र, सह्याद्री रुग्णालयाने हळूहळू माझ्या वडिलांना डॅमेज केलं. हे हॉस्पिटल बकवास आहे, थर्डक्लास आहे. सह्याद्री रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी आहे. तोपर्यंत आम्ही रुग्णालयाबाहेरून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका अजय सपकाळ यांनी घेतली.

