पुणे-पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारावरून गाजत असलेल्या पुणे मुंढवा जमीन प्रकरणात आता आणखी एक मोठे नाव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट पुण्याचे माजी उपमहापौर आणि अजित पवार गटाचे नेते नीलेश मगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या जमिनीवर सुरुवातीपासूनच अजित पवारांचा डोळा होता आणि नीलेश मगर यांनी 2018 मध्येच या जमिनीची ‘पॉवर ऑफ अटॉर्नी’ आपल्या नावावर केली होती,” असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा भूकंप झाला आहे.
अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद त्यांनी या प्रकरणाचे जुने धागेदोरे उकरून काढले आहेत. त्या म्हणाल्या, “2006 मध्ये ज्याप्रमाणे शीतल तेजवानी यांनी 89 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी केली होती, त्याचप्रमाणे 2018 मध्ये नीलेश मगर यांनी 18 लोकांची पॉवर ऑफ अटॉर्नी करून घेतली. मुळात ही जमीन ‘वतन’ जमिनीच्या प्रकारात मोडते, त्यामुळे त्यावर 18 जणांचे कुळ दाखवणे पूर्णपणे नियमबाह्य आहे.” मगर हे या प्रकरणातील ‘मोठे खेळाडू’ असून ते मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर आहेत. त्यामुळे त्यांचीही या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ‘खारगे समिती’ समोर चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी या व्यवहाराचे कनेक्शन थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेले आहे. “या जमिनीवर अजित पवारांची अनेक वर्षांपासून नजर होती. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर या जमिनीच्या खरेदीची तयारी केली. नीलेश मगर हे अजित पवारांच्या पक्षाचेच असल्याने त्यांच्या माध्यमातूनच 2018 मध्ये हालचाली सुरू होत्या,” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
…तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार : नीलेश मगर………..दुसरीकडे, माजी उपमहापौर नीलेश मगर यांनी अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना मगर म्हणाले, “2018 मध्ये पासलकर आणि ढमढेरे हे कुळ मदतीसाठी माझ्याकडे आले होते. मात्र, कागदपत्रात काहीही तथ्य न आढळल्याने मी तो विषय तेव्हाच सोडून दिला होता. सध्याचा वादग्रस्त व्यवहार हा 2025 मधला आहे, ज्याच्याशी माझा सुतराम संबंध नाही.” केवळ अजित पवारांचा कार्यकर्ता असल्याने मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून, गरज पडल्यास अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन, असा इशाराही मगर यांनी दिला आहे.

