पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी जमीन लाटण्याच्या गैरव्यवहार प्रकरणात गजाआड असलेल्या मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. जमीन घोटाळ्यात पोलिसांच्या अटकेत असतानाच शीतल तेजवानीने आता थेट बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यावर कायदेशीर दावा ठोकला असून, तब्बल 50 लाख 40 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
अभिनेता रणबीर कपूर याचे पुण्यातील कल्याणी नगर भागातील प्रतिष्ठित ‘ट्रम्प टॉवर्स’मध्ये आलिशान फ्लॅट्स आहेत. या फ्लॅटच्या भाडेकरारावरून हा वाद उफाळला आहे. शीतल तेजवानी हिने केलेल्या दाव्यानुसार, रणबीर कपूरने भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केले आहे. करारात नमूद केलेल्या ‘लॉक-इन’ कालावधी पूर्ण होण्याआधीच मला घरातून बेकायदेशीररित्या बाहेर काढण्यात आले, असा आरोप शीतलने केला आहे. या कराराच्या भंगामुळे तिने पुणे दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून, 50 लाख 40 हजार रुपये नुकसानभरपाई आणि त्यावरील व्याजाची मागणी केली आहे.
एकीकडे रणबीर कपूरवर दावा ठोकणारी शीतल तेजवानी सध्या एका गंभीर गुन्ह्यात अटकेत आहे. पुण्याच्या मुंढवा भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहारात ती मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिला मुख्य सूत्रधार मानले असून, यापूर्वी तिची दोनदा कसून चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान तिचा या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. एका बाजूला कोट्यवधींचा जमीन घोटाळा आणि दुसऱ्या बाजूला बॉलीवूड अभिनेत्यासोबतचा कायदेशीर वाद, यामुळे शीतल तेजवानी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

