; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस चौकशीचे आदेश
नागपूर, दि. ०९ डिसेंबर २०२५ : अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेच्या रचना, कामकाज आणि सभापतींच्या पदाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत जोरदारपणे मांडण्यात आला. या वक्तव्यामुळे सभागृहाचा गौरव, परंपरा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाल्याचा ठपका लावत आ. प्रवीण दरेकर व आ. श्रीकांत भारतीय यांनी विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला.
याप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोरे यांच्या भाषणाला “अवमानकारक, दिशाभूल करणारे आणि जनमानसात सभागृहाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करणारे” असे संबोधत कठोर कारवाईची मागणी केली. कार्पेटचा लाल रंग दुष्काळाचे प्रतीक आहे, विधानपरिषदेचे फक्त ७०-७५ सदस्य बसतात, सभापती कायदेपंडित नाहीत अशा वक्तव्यांमुळे सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान झाल्याचे सर्वपक्षीय सहमतीने सांगण्यात आले.
या हक्कभंग प्रस्तावावर निर्णय देताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, विधानपरिषद व सभापतींच्या घटनात्मक भूमिकेवर, सदस्यांच्या कर्तव्यांवर व सभागृहाच्या संरचनेवर अशा प्रकारची टीका करणे ही विशेषाधिकारभंगाची कृती ठरते. जनमानसात विधानपरिषदेबद्दल नकारात्मकता पसरविण्याचा हा प्रयत्न असून सभागृहाचा अवमान करण्याचा हेतू जाणवतो, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या अवमानकारक विधानांवर फक्त विशेषाधिकारभंगाची शिक्षा पुरेशी ठरणार नाही. “संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये फौजदारी कारवाई आवश्यक आहे,” असे मत नोंदवत त्यांनी पोलिसांनी तातडीने चौकशी करावी व आवश्यक त्या कायद्यांनुसार पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. हे प्रकरण हक्कभंग समितीकडेही पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी या वक्तव्याचा निषेध करत सभागृहाचा सन्मान राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. उपसभापतींनीही पक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि विधानपरिषद ही राज्याची गौरवशाली व घटनात्मक संस्था असल्याचे पुनरुच्चार केले.

