छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत केले आंदोलन
मुंबई दि. ९ डिसेंबर २०२५
इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या गोंधळामुळे हजारो प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानांची उड्डाणे मनमानीपणे रद्दी करणे, तासन् तास होणारा विलंब, कोणतीही स्पष्ट माहिती न देणे आणि प्रवाशांना दिला जाणारी अपमानास्पद वागणूक या सर्व प्रकारांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत.
इंडिगोच्या या गलथान कारभाराविरोधात आणि केंद्र सरकारच्या बघ्याच्या भूमिकेविरोधात आज मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विमानतळाच्या T2 टर्मिनलवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करून निषेध केला.
यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, इंडिगो एअरलाईन्सचे प्रशासन आणि व्यवस्थापन अक्षरशः कोसळलेले आहे. प्रवाशांचे हाल होत असताना केंद्र सरकार मूकदर्शक बनले आहे. हे केवळ दुर्लक्ष नाही, तर प्रवाशांच्या हक्कांवर केलेला प्रहार आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईनचा जबाबदारी शून्य कारभार आम्ही अजिबात सहन करणार नाही.
केंद्र सरकारने तात्काळ इंडिगो एअरलाईनवर प्रवाशांची फसवणूक, चुकीची माहिती आणि सेवा ढिसाळपणा यासाठी कठोर आर्थिक दंड लावावा.
. उड्डाण रद्द/विलंब झालेल्या सर्व प्रवाशांना तात्काळ अनिवार्य भरपाई देण्यात यावी प्रवाशांना आर्थिक व मानसिक नुकसानीचीही भरपाई द्यावी.
• कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. केंद्र सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी: प्रवाशांच्या सुरक्षेला आणि अधिकारांना धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हेगारी कारवाईचा विचार करावा.
• देशातील नागरी उड्डाण क्षेत्रासाठी कडक सेवा-हमी कायदा लागू करावा: एअरलाईन्सने प्रवाशांची फसवणूक केली तर तत्काळ कारवाई होईल अशी प्रणाली तयार करावी.
जर सरकार आणि इंडिगो प्रशासनाने या मागण्या मान्य करून तातडीने सुधारणा केल्या नाहीत, तर हे आंदोलन आणखी उग्र करू आणि प्रवाशांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारू असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरी यांनी दिला आहे.

