पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारूसह उच्च प्रतीच्या स्कॉचच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यतस्करी होत असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पहिली कारवाई पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात करण्यात आली. येथे एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मध्यप्रदेश निर्मित विदेशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वाहनासह दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई पुणे शहरातील कल्याणीनगर ते आदर्शनगर मार्गावर करण्यात आली. या ठिकाणी संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये उच्च प्रतीच्या स्कॉचसह एकूण 28 दारूच्या बाटल्या आढळल्या. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून वाहन आणि दारूसाठा मिळून सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही दारू राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी आणण्यात येत होती. आरोपींकडून दारू कुठून आणली जात होती आणि कुठे विक्री केली जाणार होती, याचा अधिक तपास सुरू आहे. मध्यप्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्यतस्करीविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

