नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगरचा आवाज बुलंद करण्याची तयारी — रात्री ब्लॅकआउटही
पुणे – लोकमान्यनगरचा पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही तिढ्यात अडकलेला असून नागरिकांच्या अपेक्षेनुसार शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पेटली आहे. चार महिन्यांपासून विविध आंदोलनांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला, नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपला आवाज बुलंद केला; तरीही प्रश्न निकाली न लागल्यामुळे लोकमान्यनगर बचाव कृती समितीने आणखी भक्कम पद्धतीने रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे.यासाठी गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दत्त मंदिर चौकात ‘घंटानाद आंदोलन’ होणार आहे. नागरिकांनी घरातून घंटा, थाळ्या, भांडी किंवा जोरदार आवाज होईल असे कोणतेही साधन घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपल्या घरासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी — आवाज मोठा करायची वेळ आली आहे,” असा संदेश कृती समितीकडून देण्यात आला आहे. पुण्यातील जैन हॉस्टेलचा प्रश्न असो किंवा मुंबईतील कबूतरखान्याचा, लोकांचा आवाज बुलंद झाला तेव्हा शासनाला निर्णय घ्यावा लागतो; लोकमान्यनगरही त्याच मार्गाने आता लढा अधिक तीव्र करत आहे.महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. या अधिवेशनात लोकमान्यनगरचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जावा यासाठी समिती सर्वतोपरी प्रयत्न करत असून दत्त मंदिर चौकातील ‘घंटानाद आंदोलन’ हीच या आवाजाला राज्यव्यापी ताकद देणारी निर्णायक पायरी ठरणार असल्याचे मानले जात आहे.आंदोलनानंतर रात्री ८ ते ८.१० वाजेपर्यंत संपूर्ण लोकमान्यनगरमध्ये दिवे बंद करून ब्लॅकआउट करण्यात येणार आहे. परिसर काळोखात बुडवून शासनाकडे निषेधाचा संदेश पोचवण्याचा हा अनोखा उपक्रम नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरत आहे. आंदोलन शांततामय आणि अनुशासित ठेवण्यावर सर्वांनी एकमत दर्शविले असून न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरचा लढाही सुरूच राहील, असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.कृती समितीकडून सांगण्यात आले की, लोकमान्यनगरच्या भविष्याचा, मुलांच्या सुरक्षिततेचा, घराच्या अधिकाराचा प्रश्न असल्याने कोणीही मागे हटणार नाही. नागरिकांची एकता हीच सर्वात मोठी शक्ती असून त्याच बळावर शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल. ऍड. गणेश सातपुते यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक एकजुटीने आंदोलन करणार आहेत.

