पर्यटकांना घडणार पुण्याच्या वारसा, कला, संस्कृतीचे दर्शन
पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे
हवाई मार्गाने पुण्यात येणाऱ्या पर्यटक-प्रवाशांना लवकरच जाता-येताना उत्तम दर्जाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना पुण्याच्या समृद्ध वारसा, कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. यासाठी नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता सध्याच्या १२ मीटरवरून २४ मीटर रुंद केला जाईल. व त्याला सुशोभीकरणाची जोड दिली जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) विकसित होणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुण्याचे खासदार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
लोहगाव येथे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे २००- २२५ उड्डाणे होतात. तर वार्षिक प्रवासीसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होते आहे. मात्र, प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ वाढल्याने विमानतळ रस्त्यावर बाराही महिने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक बनले होते. नागपूर चाळ ते विमानतळापर्यंत रस्ता हवाई दलाचा आणि खाजगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात येत नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण दीर्घकाळ रखडले होते. त्यामुळे मोहोळ यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नामुळे हवाई दलाने नागपूर चाळीपासून विमानतळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मंजुरी दिली. तसेच खाजगी जागा मालकांनी भूसंपादनाला मान्यता दिली. त्यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळपर्यंत ३ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रस्त्याची वैशिष्ट्ये
- नागपूर चाळ ते विमानतळ रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद होणार
- जागतिक दर्जाचा रस्ता विकसित केला जाणार
- पादचारी मार्ग, शोभिवंत झाडे, कारंजी, विद्युत रोषणाई- प्रवासी व नागरिकांसाठी आकर्षक फर्निचर-
- चित्र व शिल्पांद्वारे उलडगणार पुण्याचा गौरवशाली वारसा कला, संस्कृती, परंपरेचेही घडणार दर्शन
विमानतळावरून पुण्यात येताना आणि जाताना दिसणारे चित्र पाहून प्रवाशांच्या मनात पुण्याचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब उमटते. पुण्यात येताना त्यांना प्रसन्नतेचा अनुभव यावा,शहराची ओळख व्हावी आणि जाताना शहराचा समृद्ध वारसा, संस्कृती, परंपरा, सोयीसुविधा यांचा ठसा त्यांच्या मनावर कायमस्वरूपी उमटावा, यादृष्टीने हा रस्ता विकसित केला जात आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

