मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे, राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका इतका वाढला आहे की, सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या अडचणीत येत आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, देशाच्या मध्य पट्ट्यासोबतच महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार असल्याची चेतावणी वर्तवली आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.
या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट पसरणार असून, किमान तापमानात सतत घट होत राहील. मध्य महाराष्ट्रातही 10 ते 12 डिसेंबरदरम्यान काही जिल्ह्यांमध्ये शीतलहरीची चिन्हे दिसणार आहेत. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या अचानक गारठ्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
इतकेच नव्हे, तर हवामान विभागाने उत्तर-पश्चिम भारतालाही या थंडीच्या लाटेचा पुढील टप्पा असण्याची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान या राज्यांमध्येही 10 ते 12 डिसेंबरदरम्यान थंडीची तीव्रता वाढणार आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि विदर्भ या भागांमध्ये शीतलहरी सतत कायम राहील, असे हवामान तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रातील तापमान पुढील तीन दिवसांत घसरत राहील आणि त्यानंतर काही काळ परिस्थिती स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मात्र, वातावरणातील गारठ्याचे प्रमाण पुढील आठवड्यापर्यंत जाणवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

