मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय लोकशाही प्रक्रियेचे मार्गदर्शन
नागपूर, दि. ०९ डिसेंबर २०२५ : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) तर्फे राज्यातील विविध विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन आज महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्री आशिष शेलार यांनी केले तर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आभार मानले
“संसदीय प्रक्रिया समजून घेणं ही लोकशाहीची पहिली पायरी” : सभापती प्रा. राम शिंदे
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विधिमंडळ हे जनतेच्या आशा-अपेक्षा मांडण्याचे व्यासपीठ आहे. चर्चेची शिस्त, वाद-विवादाची मर्यादा आणि लोकप्रश्नांना प्राधान्य देण्याची संस्कृती येथेच शिकता येते. विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिच्या ऐतिहासिक परंपरा आणि कायदे विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत, असेही त्यांनी सांगितले.
“सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी प्रश्न विचारावेत” : विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर
अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि तर्कशुद्ध चर्चा करण्याची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, संसदीय प्रक्रिया, आचारसंहिता आणि पारदर्शकतेसाठी झालेल्या तांत्रिक सुधारणा यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“भारताची लोकशाही अनेक आव्हानांना सामोरे जात अधिक मजबूत झाली आहे”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या स्थैर्याबद्दल सांगताना भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत लोकशाही टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरल्याचे नमूद केले.
ते म्हणाले, “भारतासारखा विविधतेने भरलेला देश शांततेने, नियमबद्ध पद्धतीने लोकशाही चालवतो, हीच आपली खरी शक्ती आहे. सभागृहातील चर्चा, वाद-प्रतिवाद, समित्यांचे काम, आणि धोरणनिर्मिती — या प्रक्रियेचा अभ्यास केल्याने तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुस्तकातील सिद्धान्त यांतील अंतर समजेल.” मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन केले.
“तरुणाई हीच लोकशाहीचं भविष्य” : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्या प्रभावी भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भविष्यातील नेतृत्व हीच आजची तरुणाई आहे. खरं तर आपल्या महान संसदीय लोकशाहीचं भविष्य इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यात आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची शाखा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या अभ्यासवर्गातून लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात, ते कसं करायला हवं, निर्णयप्रक्रिया कशी चालते, याचा सखोल अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. ते पुढे म्हणाले की, शासनातील बदलत्या अपेक्षांसोबत विद्यार्थ्यांनीही नेतृत्वाची नवी तयारी करणे आवश्यक आहे.
“राष्ट्रीयकुल संसदीय मंडळातर्फे होणाऱ्या या संसदीय अभ्यासवर्गाची प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणारी भूमिका”: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
समारोपात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की राजकारण म्हणजे फक्त भाषण नव्हे, तर अभ्यास आणि योग्य निर्णयक्षमता हाच नेतृत्वाचा आधार आहे. त्यांनी विधानपरिषदेत घेतले जाणारे ऐतिहासिक निर्णय, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे आंतरराष्ट्रीय अनुभव, आणि जागतिक लोकशाही परंपरा यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्याने प्रकाशित ‘महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व’ तसेच याच मालिकेतील द्वितीय ग्रंथ “विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे”, प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

