पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे.
ते म्हणाले ,डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे.
असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. ‘माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ’ ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते.
पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते. पुण्याचा खासदार या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

