पुणे:आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील.अशा शब्दांत शरद पवार यांनी बाबा आढाव यांना आदरांजली अर्पण केली.
आज ज्येष्ट समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांचे निधन झाले .शरद पवार म्हणाले,बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. ‘एकाकी मजदूर’ चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले.

