पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती.तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर , व्ही पी सिंह यांना बाबा आढावांच्या सामाजिक कार्याबाबत मोठा आदर होता या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान असताना देखील पुण्यात बाबा आढाव यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला होता. समाजवादी नेते म्हणूनच नव्हे तर ते कष्टकरी समाजाचे नेते म्हणूनही त्यांचा परिचय होता.भाई वैद्य , एस एम जोशी , मोहन धारिया आणि बाबा आढाव हि पुण्यातील समाजवादी नेते मंडळी देशभर आपल्या कार्याने परिचित होती.
बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री 8.25 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख होती, मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.
ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश
बाबा आढाव खऱ्या अर्थाने संघर्ष करणारे नेते होते. त्यांनी गेल्यावर्षी ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सलग तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर टीका केली होती. त्यानंतर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिवून त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, संजय राऊत या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.
बाबा आढाव यांचा जन्म १९३७ मध्ये पुण्यात झाला. ते नाना पेठेतील नामांकीत आयुर्वेदिक डॉक्टर होते. याच नाना पेठ भागात अनेक व्यवसायांतील कामगार त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतं त्यातूनच त्यांना हमालांना येणार्या अनेक अडचणी लक्षात आल्या. हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. अखेर त्यांनी १९६६ मध्ये बाबांनी डॉक्टरकीचा व्ववसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले.
डॉ. बाबा आढाव सुरुवातीला समाजवादी पक्षाबरोबर काम करायचे. मात्र, त्यांनी तो राजकीय पक्ष सोडला आणि १९५५ मध्ये हमाल पंचायत स्थापन केली. याच पंचायतीची पुढे १९७२ मध्ये कामगार संघटना झाली. १९५६ मध्ये वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे, या मागणीसाठी हमाल पंचायतीने पहिले आंदोलन केले. त्यानंतर त्यासाठी केलेल्या सततच्या संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला. असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील हा पहिला कायदा होता. याच संपूर्ण श्रेय हे बाबा आढाव यांच्या संघर्षालाच जाते. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ हीदेखील आढाव यांचीच कल्पना होती. या योजनेतील पहिल्या शाखेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७४ रोजी भवानी पेठेत झाली

