ज्यांनी तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली– आज ‘वंदे मातरम’चे गोडवे गाणाऱ्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.
स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ राहिलेली नाही. त्यांच्यात ‘आत्मभान’ उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, ‘सेवा मंदिरा’चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
‘वंदे मातरम’चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

