निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद
पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया आज उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. पक्षाचे पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे व पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप साहेब या दोघांच्या हस्ते पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सामाजिक न्यायाच्या धोरणाला अनुसरून उमेदवारी अर्जाची रक्कम निश्चित केली आहे.ओपन व ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारी अर्जासोबत २०,००० रुपये, तर अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १०,००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. अर्जाचा फॉर्म शुल्क केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले असून, सर्वसामान्य कार्यकर्ते, तरुण आणि समाजाच्या विविध घटकांना संधी देण्याचा पक्षाचा ठाम उद्देश यातून स्पष्ट होतो. अर्ज विक्रीस सुरुवात व अर्ज स्वीकारण्याची तारीख 8 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत अशी 10 दिवस ठेवण्यात आली आहे.
आज दिवसभरात सुमारे २०० हून अधिक उमेदवारी अर्ज वितरित झाले असून, यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुणेकरांचा असलेला विश्वास आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबतची सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे दिसून येते. आजी-माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी तसेच नव्या नेतृत्वाने मोठ्या उत्साहाने अर्ज घेतले.
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून, सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेले व जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळेच उमेदवार निवड प्रक्रियेत सामाजिक समतोल, कार्यक्षम नेतृत्व आणि लोकसेवेची बांधिलकी हे प्रमुख निकष असतील, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

