फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : इंडो-कोरियन सेंटर, किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित कोरियन सांस्कृतिक महोत्सवाला विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि कोरियन संस्कृतीच्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फॅशन शो, के-पॉप, फ्युजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीचे विविध स्टॉल, चार ऋतूंचे प्रदर्शन आदी उपक्रमांनी पुणेकरांची मने जिंकली.
बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरचा संपूर्ण परिसर कोरियन रंग, संगीत आणि के-पॉपच्या उत्साहाने रंगून गेला. दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्य दूत यु डोंग-वॉन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारत–कोरिया सांस्कृतिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. इंडो-कोरियन सेंटरच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, सहसंस्थापक आणि करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख संजीब घटक आदी उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात डॉ. एउन्जु लिम म्हणाल्या, कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा व पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत २०२३ मध्ये स्थापन झालेल्या इंडो-कोरियन सेंटर या संस्थेत कोरियन भाषेचे प्राथमिक व माध्यम स्तरावरील अभ्यासक्रम तसेच इंटरप्रिटेशन, कोरियन संगीत, कोरियन-थ्रू-मीडिया आणि कामकाजासाठी लागणारा प्रोफेशनल कोरियन असे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कोरियातील उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते.
महोत्सवाची सुरुवात सेजोंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणांनी झाली. इंडो-कोरियन फ्यूजन संगीत, कोरियन काव्यपठण आणि उत्साहवर्धक के-पॉप डान्सने उपस्थितांना कोरियन संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली. निवांत, संवादात्मक वातावरणामुळे भेट देणाऱ्यांना कोरियन संस्कृतीशी सहज जुळवून घेता आले.
कल्चरल अॅक्टिव्हिटी झोन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. स्क्विड गेम-वर आधारित खेळांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच ‘फोर सीझन्स ऑफ कोरिया’ फोटोबूथ, हान्गूल कॅलिग्राफी, नामसान टॉवरच्या मॉडेलवर रंगीबेरंगी हृदय-लॉक्स टांगणे आणि कोरियन-स्टाइल फेस पेंटिंग अशा उपक्रमांमध्येही भेट देणाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोरियन लोकप्रिय स्नॅक्स देणारा फूड काऊंटरही विशेष लोकप्रिय ठरला. यावेळी सत्र-३ चा समारोप समारंभही पार पडला. विद्यार्थ्यांनी आपले अनुभवकथन केले. उत्कृष्ट कामगिरी, उपस्थिती आणि मेहनतीसाठी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शेवटी रंगतदार फॅशन शो आणि उत्साहात भर घालणाऱ्या के-पॉप रँडम प्ले डान्सने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. इंडो-कोरियन सेंटर भाषिक, सांस्कृतिक आणि करिअर-केंद्रित कार्यक्रमांचा विस्तार करत असून, पुण्यातील वाढत्या के-कल्चर समुदायासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रास्ताविकात संजीब घटक यांनी नमूद केले.

