नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : मुख्यमंत्री यांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोकभवन, नागपूर येथे जाऊन राज्यपालांना प्रदान केले.
सदिच्छा भेटीदरम्यान राज्यकारभार, राज्यातील विकासात्मक उपक्रम, विधिमंडळातील कार्यपद्धती आणि जनकल्याणाशी निगडित विविध विषयांवर सखोल व विधायक चर्चा झाली. राज्यपालांनी लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत सभापती व उपसभापती यांच्याशी मार्गदर्शक व सूचनापूर्ण संवाद साधला.
या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून त्यांचा सत्कार केला. तसेच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा माननीय राज्यपालांना भेट म्हणून प्रदान केली. ही सदिच्छा भेट लोक भवन येथे स्नेहपूर्वक व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

