विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ची मागणी
पुणे: महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर, जागतिक वारसास्थळांवर स्वच्छता, पायाभूत सुविधा, माहितीफलक, डिजिटल गाईड यांसारख्या अत्यावश्यक सुविधा नाहीत. येथील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था असून, याठिकाणी तातडीने सुधारणांची कामे करावीत. त्यासाठी विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी राज्यसभेत केली.
सभापतींचे लक्ष वेधताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वारशाचे प्रतीक असलेले महाराष्ट्राचे ११ किल्ले युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीत समाविष्ट झाले, हे महाराष्ट्रासाठी अभिमानाचे पाऊल आहे. शिवनेरी, राजगड, रायगड अशा इतिहासप्रसिद्ध दुर्गांचा त्यामध्ये समावेश आहे. याआधी अजिंठा-वेरूळ, घारापुरी, तसेच पुण्यातील शनिवारवाडा यांसारख्या ठिकाणांनाही जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे.”
या वारसास्थळांच्या ठिकाणी इतिहास जाणून घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, या सर्व पर्यटनस्थळांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता, डिजिटल माहितीचा अभाव, गाईड वा मार्गदर्शकाची अनुपलब्धता, कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक व आग लागल्याने पर्यावरणाची हानी, दिव्यांगांसाठी सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.
राजगड किल्ल्यावरच्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, किल्ल्यावरील स्वच्छतागृह कचऱ्याने भरलेले होते, प्लास्टिकच्या बाटल्या आणि रॅपर्सचे ढीग होते. काही ठिकाणी हा कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते आणि वन्यजीवांनाही धोका निर्माण होतो. महाराणी सईबाईंची समाधी पूर्णपणे दुर्लक्षित आहे, तर संजीवनी माचीसारख्या अद्वितीय वास्तु-संकल्पनांना पुरेसे माहितीफलक नसल्याने पर्यटकांना त्याचे महत्त्व समजत नाही, असे त्यांनी नमूद केले.
रायगड हा महाराष्ट्राचा भावसंपन्न आणि ऐतिहासिक केंद्रबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा विस्तार आणि भव्यतेसाठीही विशेष पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील किल्ले, गड-किल्ल्यांचा वारसा हा फक्त प्रदेशाचा नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि जागतिक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे तेथील विकासासाठी विशेष पॅकेज आणि हेरिटेज मिशनची मागणीही त्यांनी यावेळी केली.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख मागण्या:
– आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी ‘हेरिटेज इन्फ्रा अपग्रेडेशन पॅकेज जाहीर करावे
– पुढील ३ महिन्यांत राज्यातील सर्व हेरिटेज स्थळांचे व्यापक सर्वेक्षण करावे
– युनेस्को मानांकन प्राप्त स्थळांवर सुविधा विकसित करण्यासाठी पॅकेज द्यावे
– बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावीत

