मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 21 डिसेंबरला होणार होती. जिल्हा पातळीवर या परीक्षेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. पण 21 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी या मतमोजणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षा होणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी एका परिपत्रकाद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. आता 21 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होईल.
आयोगाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका – 2025 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर 2025 च्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागवण्यात आली होती.
या माहितीनुसार, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करम्यास अडचणी उद्धवू शकतात असे कळवले आहे. सदर वस्तुस्थिती विचार घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
त्यानुसार, महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2025 ही 4 जानेवारी 2026 रोजी होईल, तर महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2025 ही 11 जानेवारी 2026 रोजी होईल, असे आयोगाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा 674 पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी 3, राज्य कर निरीक्षक 279 पदे आणि पोलिस उपनिरीक्षकाच्या 392 पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ 2025 (अराजपात्रित) परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे ती परीक्षा 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ती पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

