पुणे -मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या निलंबित तहसीलदाराने आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख कशी आली? असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळ सरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचे ते म्हणालेत.
पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले. त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही जमीन अमेडियाला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी नामक महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरल्याचे समोर आले आहे.
विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे हा मुद्दा उजेडात आणला आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांने कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी ₹85.50 लाख रोख भरले. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेलीय. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगचा प्रकार दिसतो! ED व सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी, असे ते म्हणालेत. कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी या प्रकरणाच्या चौाकशीची मागणी केली आहे.
विजय कुंभार व अंजली दमानिया म्हणतात, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत गुलाबराव येवले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची कर्ज खाती नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बावडा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे आहेत.
1) चंद्रकांत गुलाबराव येवले, मु. पो. भोगाव, ता. वाई, जि. सातारा – कर्ज खाते क्र. 195/99 थकबाकी – 52.50 लाख
2) बाळकृष्ण जगू जाधव, मु. पो. खानापूर, ता. वाई, जि. सातारा – कर्ज खाते क्र. 295/132. थकबाकी – 33 लाख.
वरील दोन्ही खात्यांना आरोपी सूर्यकांत येवले हे जामीनदार आहेत. दोन्ही खात्यांची एकूण थकबाकी 85 लाख 50 हजार एवढी होती. दैनिक पुढारी व 7/12 यावरूनही सूर्यकांत येवले यांच्या दोन्ही मिळकतींवर जप्ती आदेशाने नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असल्याचे दिसते.
आमच्या माहितीनुसार, दिनांक 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सूर्यकांत येवले यांनी एकूण 85.50 लाख इतकी संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात नागरी सहकारी पतसंस्थेत जमा केली असल्याचे दिसून येते.
या संदर्भात गंभीर शंका निर्माण करणारे मुद्दा पुढीलप्रमाणे –
एका सामान्य शासकीय अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात कशी जमा केली?
सहकारी पतसंस्था एकाच व्यक्तीकडून एवढी मोठी रोख रक्कम कायद्याने स्वीकारू शकते का?
ही रक्कम मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारातून आली असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. अशा स्वरुपातील व्यवहार काळा पैसा पांढरा करण्याचा (मनी लाँड्रिंग) गंभीर प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
म्हणूनच आमची आपणास विनंती आहे की, सूर्यकांत येवले यांनी जमा केलेल्या 85.50 लाखांच्या मूळ स्त्रोताची अतिशय सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या व्यवहारात सहभागी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, तिचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची चौकशी करावी.
हा व्यवहार मुंढवा जमीन घोटाळ्यातील पैसे वळवण्यासाठी वापरला गेला का? याची स्वतंत्र चौकशी आर्थिक गुन्हे शाखा/ अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत केली जावी.
सदर व्यवहारातील कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित आरोपी, जामीनदार, तसेच संस्थेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकणातील आर्थिक बाबींमागे प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचा ठोस व स्पष्ट संशय निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ व प्रभावी कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आपण याबाबत त्वरीत चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही विनंती, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

