“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खात्री करा”- सभापती प्रा. राम शिंदे
“दूरध्वनी–इंटरनेट सेवा अखंडित ठेवा; आरोग्य, अॅम्ब्युलन्स व आपत्कालीन पथके सदैव सज्ज असावीत” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२५ च्या (हिवाळी) अधिवेशनासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानभवनात सविस्तर आढावा बैठक घेतली. सोमवार, दि. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने आणि सक्षम नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.
मंत्रीपरिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला विधानमंडळाचे सचिव श्री. जितेंद्र भोळे, श्रीमती मेघना तळेकर, श्री. वि. गो. आठवले, शिवदर्शन साठे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनामध्ये सहभागी होणारे मंत्री, आमदार, तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांना आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही वेगाने करण्याचे निर्देश सभापती व उपसभापती यांनी दिले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट नियोजनातून अधिवेशन निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानभवनासह अधिवेशनाशी संबंधित सर्व इमारतींच्या वीजपुरवठ्याची चाचणी पूर्ण झाली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष मनुष्यबळ तसेच पर्यायी जनरेटर प्रणाली उभारण्यात आली आहे. विधानमंडळ परिसरात पार्किंग स्लॉटची व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक सुसूत्रिकरणाबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट दिशा देण्यात आली. विधानभवनात हिरकणी कक्षाचीही व्यवस्था आहे.
अधिवेशन कालावधीत दूरध्वनी, इंटरनेट व वायफाय सेवा अखंडित सुरू राहतील. नागभवन, रविभवन व आमदार निवास येथे २४ तास अॅम्ब्युलन्स तसेच अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी विधानभवन परिसरातील आतल्या-बाहेरच्या सुरक्षा बंदोबस्ताचा आढावा घेऊन आवश्यक पोलिस पथके तैनात केली आहेत. अधिवेशनात व्हीआयपींना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी ‘पास’ सक्तीने घ्यावा लागेल, असे स्पष्ट करतानाच विनापास प्रवेशाची समस्या रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
अधिवेशनादरम्यान निवास व्यवस्थेबाबतही कोणतीही तडजोड न करता शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या निवासस्थानी स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अग्निशमन सेवांसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. विधानभवनसह नागपुरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून आवश्यक डॉक्टर, औषधे आणि अॅम्ब्युलन्स यांचीही उपलब्धता सुनिश्चित केली आहे. सर्व इमारतींचे फायर ऑडिट पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकारांसाठी सुयोग इमारतीतील ३८ कक्ष अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले असून अधिवेशन काळात त्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत राहणार आहे. तसेच यावेळी सभापती व उपसभापती यांनी विधानभवनातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मंत्री दालनाचीही पाहणी केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ दुर्मिळ अंक प्रदर्शनाला भेट देत त्यांनी प्रदर्शनातील विविध महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची माहिती घेतली.
बैठकीनंतर सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद व विधानसभेच्या सभागृहांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व भौतिक सुविधा तयार आहेत का याची सखोल तपासणी केली.
हिवाळी अधिवेशन आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात काटेकोर नियोजन आणि समन्वय राखत सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असा ठाम संदेश सभापती आणि उपसभापती यांनी यावेळी दिला.

