पुणे : किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचा सुंदर मिलाफ दाखविणारे पद्मश्री पंडित डॉ. एम. व्यंकटेश कुमार यांचे प्रगल्भ तर आश्वासक युवा गायिका शिवानी मारुलकर-दसककर यांच्या प्रभावी गायनाने रसिकांची सकाळ संस्मणीय ठरली.
निमित्त होते निनादिनी आणि ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘देवगांधार : अमृत-स्वर’ या सांगितीक महोत्सवाचे. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रम झाला. महोत्सवाचे यंदाचे १७वे वर्ष आहे.
प्रथम सत्रात ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्याचा वारसा जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी अलका देव-मारुलकर यांच्या शिष्या व कन्या शिवानी मारुलकर-दसककर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग गुजरी तोडीतील विलंबित तीन तालातील ‘सुघर बन री’ या पारंपरिक बंदिशीने केली. मध्य द्रुत अध्धामधील ‘मै जानत तोहे’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘भर डारुंगी रंग सो’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. कोमल धैवताचा विभास ऐकविताना त्यांनी डॉ. अलका देव-मारुलकर रचित मध्य रूपकातील ‘हे करो मंगल’ ही भक्तीरचना सादर केली. संपूर्ण जगाचे कल्याण होऊ दे, सर्वत्र सकारात्मकता पसरू दे या आशयाच्या बंदिशीच्या सादरीकरणातून शिवानी यांनी भक्तीरसाची जागृती करत भावपूर्ण गायनातून रसिकांना आनंदित केले. अमेय बिचू (संवादिनी), प्रणव गुरव (तबला), शिवानी मोघे-लाड, निधी अगरवाल (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
‘समझा मना कोई नही अपना’..
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भारतीय शास्त्रीय संगीतातील ओजस्वी आवाज असलेले तसेच भक्तीभाव आणि अवघड ताना, सरगम लिलया सादर करणारे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री पंडित डॉ. एम. व्यंकटेश कुमार यांची गायन मैफल रंगली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग जौनपुरीमधील ‘बाजे झनन पायलिया मोरी’ या बंदिशीने केली. द्रुत लयित ‘नाम लेलो हरदम मौला’ रचना सादर केल्यानंतर पंडित व्यंकटेश कुमार यांनी अतिशय क्लिष्ट समजला जाणारा देसकार राग ‘हुतो तोरे कारन जागी रे’ या बंदिशीतून प्रभावीपणे मांडला. ‘काज किजिए हररोज’ ही रचना कोमल रिषभ आसावरीत सादर करून रसिकांसाठी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ही मराठी भक्तीरचना सादर केली. त्यानंतर ‘तोरे बुजिस बहुदे’ ही कन्नड भाषेतील भक्तीचरना रसिकांच्या आग्रहास्तव ऐकविली. मैफलीची सांगता भैरवीतील ‘समझा मना कोई नही अपना’ या रचनेने करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित व्यंकटेश कुमार यांच्या अमृतस्वरांच्या स्वरवर्षावात रसिक चिंब झाले. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवराज पाटील, कैवल्य पाटील (तानपुरा आणि सहगायन) यांनी साथसंगत केली.
मैफल के राजा बने रहे…
डॉ. अलका देव-मारुलकर यांनी पंडित व्यंकटेशकुमार यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत ‘मैफल के राज बने रहे’ अशा शब्दात शुभचिंतन केले. पंडित व्यंकटेशकुमार यांचे गायन हा फक्त स्वराविष्कार नसून तो स्वरावतार असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या व डॉ. अलका देव-मारुलकर यांनी स्वरसाज चढविलेल्या ‘जय जय जननी देवी’ या गीताच्या सादरीकरणाने झाली. डॉ. मारुलकर यांच्या शिष्यांनी हे गीत सादर केले. कलाकारांचा सत्कार मधुवंती देव, प्रफुल्ल देव, किरण जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.

