पुणे -महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – महाराष्ट्र प्रदेश यांच्या सुचनेनुसार, पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाने निर्धारित केलेला विहित नमुन्यातील इच्छूक उमेदवारी अर्ज 8 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत भरावयाचा आहे.अशी माहिती येथे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी कळविली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर “मध्यवर्ती कार्यालय” येथे निर्धारित कालावधीतच इच्छूकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पक्षाच्या सूचनेनुसार अर्ज पूर्ण तपशीलांसह दिलेल्या मुदतीतच सादर करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे
तर महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मंगळवार ९ डिसेंबर पासून देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.मंगळवार ९ डिसेंबर ते शनिवार १३ डिसेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या कालावधीत जमा करावेत. अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

