मुंबई- नेहमी एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि विचारधारांच्या भिंती उभ्या असणाऱ्या नेत्या जेव्हा खासगी कार्यक्रमात ‘डान्स फ्लोअर’वर एकत्र येतात, तेव्हा भुवया उंचावणे साहजिक आहे. भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात असाच एक प्रसंग घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी एकाच गाण्यावर ठेका धरला असून, त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.त्याचबरोबर नेटकऱ्यांचा संताप देखील ‘जनतेला मूर्ख बनवताय का?’ या शब्दात व्यक्त होतो आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्र येणे ही चांगली बाब असली तरी, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ‘राजकीय वैर फक्त जनतेला दाखविण्यासाठी असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,’ अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, कंगना रनौट आणि महुआ मोईत्रा यांचा नृत्याची रिहर्सल करतानाचा फोटो समोर आला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या तिन्ही नेत्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर उत्साहात नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यजमान आणि भाजप खासदार नवीन जिंदाल हेदेखील व्यासपीठाच्या मध्यभागी उपस्थित असून त्यांनीही या आनंदाच्या क्षणी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
‘राजकीय वैर फक्त जनतेला दाखविण्यासाठी असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,’ अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत.विशेषतः कंगना रणौतने यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा उमटले आहेत. सोशल मीडियावरील ‘डॉ. निमो यादव’ आणि ‘अमॉक’ या हँडल्सवरून या प्रकारावर सडकून टीका करण्यात आली आहे. “ज्या कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते, त्याच कंगनासोबत भाजपविरोधी बाकांवरील सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा डान्स कसा करू शकतात?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा कळस असून, सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.लग्नापूर्वी कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून नृत्याच्या तालीमचा फोटो शेअर केला होता. ‘सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले,’ असे कॅप्शन तिने दिले होते. तेव्हापासूनच या अनोख्या ‘राजकीय जुगलबंदी’ची चर्चा रंगली होती.

