लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
पुणे : सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा बनला आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणेकरांचे मोठे योगदान आहे. आज लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताह कार्यक्रमात ‘लोकशाहीची हत्या व वोटचोरी’ या विदारक सत्यावर आधारित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे आणि चेतन अग्रवाल उपस्थित होते.
आपल्या भाषणात थोरात म्हणाले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा, तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता काबीज केली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट—या घटनांनंतरही समाज उदासीन राहणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या ठरावीक पॅटर्नवर सत्तेत आले असून ही जनतेची व लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुका झाल्यानंतर निकाल पुढे ढकलणे आणि नंतर ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीस घातक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली असून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले की, लोकशाहीची हत्या आणि मतचोरीचे विदारक वास्तव दाखवणारे हे प्रदर्शन लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे. केंद्र सरकारविरुद्ध लोकांमध्ये वाढता असंतोष दिसत असून मतचोरीची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मतदार याद्यांतील घोळही तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम संयोजक मोहन जोशी म्हणाले की, पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे श्रेय काँग्रेसचेच आहे. आजवर २५ पेक्षा जास्त प्रकल्प राबवून शहराचा विकास साधला. ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ सप्ताहातून जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अविनाश बागवे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले, तर सुनील मलके यांनी आभार मानले.

