इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टनुसार कारवाई होईल- मंत्री मोहोळ
पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांचा मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी इंडिगोची पुण्यात येणारी २१ आणि येथून जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विस्कळीत सेवेचा गैरफायदा घेत इतर कंपन्यांनी तिकीट दर तिप्पट वाढवले आहेत. या सर्व घटनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं आहे. गेले काही दिवस विमानप्रवाशांना खूप त्रास झाला आहे. इंडिगोने गेल्या 2-3 महिन्यांत करायच्या तांत्रिक गोष्टी होत्या, त्या केल्या नाही. त्याचा हा परिणाम आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने मागणी केली होती की, आमचा ड्युटी टाईम 10 तासांवरून 8 तास करावा. हायकोर्टाने तसे आदेशही दिले होते, डीजीसीएने तशी अंमलबजावणी करण्यास सांगितले होते, इंडिगोने मात्र वेळ तशी पाळली नाही, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.
तर, इंडिगो देशातली 65 टक्के विमानसेवा देते. आधीच पायलटची कमतरता आणि त्यातून ड्युटीचे तास दोन तासांनी कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. इंडिगोला सगळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली आहे. 4 सदस्यीय चौकशी समिती त्यासंदर्भात नेमली आहे. डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. इतर विमान कंपन्यांच्या किमतींवर कॅप लावली आहे. शिवाय ज्यांची विमानं रद्द झाली, त्यांना संपूर्ण रिफंड ४८ तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कालपासून परिणाम थोडा-थोडा कमी व्हायला लागला आहे. पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ५७ विमानसेवा होत्या. त्यातील आज ३७ विमानसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच्या चुकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
इंडिगोनं फ्लाईट रद्द कराव्या लागल्या त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली. त्यामध्ये सॉफ्टवेअरमधील ग्लिच, हिवाळ्यामुळं वेळापत्रकातील बदल, वातावरण या कारणामुळं फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारणं सांगितलं गेलं. मात्र, हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली. एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले होते.
सध्या तरी पुणे विमानतळावर परिस्थती नियंत्रणात आहे. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणे आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमानतळ व्यवस्थापनाकडून आत मध्ये २०० अधिक खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आतमध्ये असलेल्या सगळ्या उपाहारगृहात खाद्य पदार्थांचा मुबलकसाठा करण्यात आला आहे. पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा फटका बसला आले. पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले. इंडिगोचे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द झाली आहे.

