पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महायुतीतील एखाद्या पक्षासोबत आघाडी करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये पेरण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मोदी बागेत भेट घेतली. या भेटीत प्रशांत जगताप यांनी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वासमोर मांडले. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुणे शहरात आपण महाविकास आघाडी सोबत लढणार असे निर्देश शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिले आहेत. याबाबत प्रशांत जगताप यांनी स्वतः माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे पार पडली. या बैठकीतही बहुतांश नेत्यांनी आपण महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत न जाता महाविकास आघाडी म्हणून शहरात लढावे अशी भूमिका मांडली. या बैठकीचा वृत्तांत उद्या पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांना पाठवला जाईल. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल हे सर्वानुमते मान्य करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, कमलनानी ढोले पाटील, जगन्नाथबापू शेवाळे, अंकुश काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, रवींद्र माळवदकर, अश्विनी कदम, सुरेंद्र पठारे, पंडित कांबळे, डॉ. सुनील जगताप, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह इतरही नेते या बैठकीस उपस्थित होते.यानंतर पुढील दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम व पक्षाच्या जाहीरनामा बाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
ही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आता पूर्णविराम मिळाला आहे.पुणे महापालिकेच्या निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढल्यास केवळ अजित पवारांच्या पक्षाचा फायदा होईल आणि आपल्या पक्षाच नुकसान होईल हे आपण शरद पवारांना पटवून दिल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात एकत्र आल्यास अजित पवारांच्या पक्षाच्या ४० ते ४५ जागा निवडून येतील मात्र आमच्या फक्त तीन ते अकराच जागा निवडून येतील. मात्र दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास शरद पवारांच्या पक्षाच्या २३ ते ४७ जागा निवडून येतील असं प्रशांत जगतापांच म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत पुण्यात आघाडी करण्यास विरोध केला आहे. प्रशांत जगतापांनी हे आकडेवारीनीशी शरद पवारांना पटवून दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार आग्रही असून शरद पवारांच्या पक्षात असलेल्या अंकुश काकडेंना त्यासाठी अजित पवारांनी फोन देखील केला होता. मात्र अंकुश काकडेंना आपण आपली बाजु पटवून दिल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर निवडणूकीनंतर अजित पवार पुन्हा पुणे महापालिकेत भाजपसोबत युती करतील असही भाकित जगताप यांनी वर्तवलंय.

