पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दमिष्टे यांनी दिली. प्रसंगी सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे, कार्यकर्त्या अर्चना कुभांरकर, नंदिनी कुंभारकर, कुसुम लोणारे, सुनिता चाकणकर आणि वैशाली दमिष्टे आदी उपस्थित होते.
सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या, “शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या ३० वर्षांपासून या भागात आम्ही १२ डिसेंबरला विविध समाजोपयोगी उपक्रम घेत असतो. यंदा आठवडाभर हे उपक्रम चालणार आहेत. देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. व्यावसायिक मेळावा १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व माजी आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या उपस्थितीत असून, या मेळाव्यात उद्योग संक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन आहेत.”
“विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल १४ डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी, पर्वती येथील क्रिकेट संग्रहालय येथे आयोजित केली आहे. क्रिकेट स्पर्धा १६ व १७ डिसेंबर रोजी वडगाव आणि धायरी येथील क्रीडांगणावर होणार आहेत. त्याचदिवशी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा होणार आहेत. यासह इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागीना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,” असे निलेश दमिष्टे यांनी नमूद केले.

