पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो प्रवाह पुढे जात जात स्वरसमुद्राला जाऊन मिळतो. ज्या योगे घराण्याची परंपरा मोठी होत जाते. ही घराणी म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध परंपराच आहेत, पण असे असले तरी सांगितीक घराण्यांचा वाद कधीच असू नये. घराण्याविषयी आपलेपणा असला तरी दुसऱ्यांच्या घराण्यातील वेगळेपण जाणून घेतल्यास घराण्यातील भिंती असून देखील त्यांचा अडथळा जाणवत नाही, तर सर्वसमावेशक दृष्टी निर्माण होते, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक, पंडित अरुण कशाळकर यांनी केले.
ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त निनादिनी आणि ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगितीक महोत्सवात आज (दि. ६) डॉ. मारुलकर यांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी पंडित कशाळकर बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित अरुण कशाळकर पुढे म्हणाले, घराण्यांची स्वतंत्र ओळख असली तरी आपल्या हस्ताक्षराचे मालक आपणच असतो, त्याला वळण लावण्याचे काम गुरू करत असतो, त्यामुळे गुरूंचे महत्व मोलाचे आहे. विदुषी मारुलकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, आपण उत्तम शिष्यवर्ग घडवत आहात. शिष्यांच्या चेहऱ्यावरील प्रामाणिक हसू हा गुरूंचा सन्मानच होय. आपला शिष्यपरिवार म्हणजे देवनगरीत जमलेली जणू देव माणसेच आहेत. तुमचा माझ्या हस्ते सत्कार होणे म्हणजे माझ्या लहान बहिणीचा सत्कार केल्याचे समाधान आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल ललित कला केंद्रातर्फे डॉ. अलका देव-मारुलकर यांचा डॉ. चैतन्य कुंटे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गानवर्धनतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, डॉ. राजश्री महाजनी, सविता हर्षे, डॉ. निलिमा राडकर, वासंती ब्रह्मे, डॉ. विद्या गोखले यांच्या हस्ते डॉ. मारुलकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिष्य परिवारातर्फे मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन डॉ. अलका देव-मारुलकर यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
सुरुवातीस पंडित अरुण कशाळकर, विदुषी अलका देव-मारुलकर, डॉ. चैतन्य कुंटे, प्रफुल्ल देव, मधुवंती देव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पंडित अरुण कशाळकर यांचे स्वागत मधुवंती देव यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची गायन मैफल झाली. त्यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग पट बिहागमधील विलंबित तीन तालातील ‘लेत जायो री संदेस’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‘बैरन भई’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. राग कानडा बहार सादर करताना डॉ. अलका देव-मारुलकर यांनी मध्यलय रूपक तालातील ‘आज रंग भीनो सोहे बलमा’ ही बंदिश बहारदारपणे सादर करून रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता मिश्र भैरवीमधील ठुमरीने करून आपल्या गायनाचा ठसा रसिकांच्या मनावर उमटविला. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला), मधुवंती देव, कल्याणी तत्त्ववादी, मधुवंती भिडे (तानपुरा-सहगायन) यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.

