7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख..
मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन.! केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु देशवासीयांनाही सैनिकांप्रती कर्तव्य बजावण्याची संधी मिळावी आणि जनसहभागातूनही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी थेट निधी देता यावा, यासाठी ध्वज दिन निधी संकलन करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात देशभर साजरा केला जात आहे..
✦ ध्वजदिनाची पार्श्वभूमी
२८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी नागरिकांना सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची परंपरा सुरु करण्यात आली. १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध सैनिक कल्याण निधी एकत्र करुन त्याचे एकत्रित नाव “सशस्त्र सेना ध्वज दिन निधी” असे ठेवण्यात आले. तसेच हा निधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येऊ लागला.
✦ ध्वज दिनाचा उद्देश
*नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.
*सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.
*शहीद सैनिकांचे कुटुंब, जखमी जवान, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.
*सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्व, दातृत्व निर्माण करणे.
*तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणे, हे ध्वज दिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.
✦ ध्वज निधी संकलन कशासाठी- ध्वज दिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, निवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी शासन आपली जबाबदारी निभवते, परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रती सहवेदना व्यक्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश आहे.
✦ निधीचा वापर –
राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के निधी राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी वापरला जातो.
✦ निधी संकलन –
सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२३ सालासाठी महाराष्ट्र राज्याला ३६ कोटी ६४ लाख रुपये उद्दिष्ट दिले होते, परंतु ४३ कोटी ६८ लाख २ हजार ५४ रुपये म्हणजेच ११९.२१ टक्के निधी संकलित झाला. तर सन २०२४ वर्षासाठी ४० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते, पण नागरिकांच्या उस्फुर्त सहभागामुळे ४८ कोटी ९४ लाख ८१ हजार ३१८ रुपये म्हणजेच १२२.३७ टक्के निधी संकलित झाला आहे. ही आकडेवारी देशवासीयांच्या देशभक्तीची, सैनिकांप्रती असलेल्या आदराची, प्रेमाची, सन्मानाची व अभिमानाची साक्ष असून या निधीच्या माध्यमातून आपणही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी थेट योगदान देऊ शकतो.
✦ उत्कृष्ट निधी संकलनाबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मान –
सशत्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनात सर्वात जास्त निधी संकलन केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त तसेच सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, अमरावती, नागपूर या ६ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा ध्वजदिन निधी कल्याण समितीचे अध्यक्ष व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना मुंबई येथील लोकभवन(राजभवन) मध्ये १० डिसेंबर २०२५ रोजी होणा-या ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर मध्ये ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम होणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभाग, पुणे संचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
✦ अनेक व्यक्ती, संस्थांचे योगदान – सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योग संस्था, संघटना, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, देशवासीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने देणगी देतात.
✦ निधी जमा करण्यासाठी संपर्क –
- संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या नावाने
- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घोरपडी, पुणे
- Name of Account : FLAG DAY FUND (PUBLIC) Bank A/c No. : ६००६१३४७७८४, IFSC Code- MAHB0000184,
- MICR Code-411014004 यामध्ये
- रोख, धनादेश अथवा CBS द्वारे ध्वज निधी जमा करता येतो.
- आपल्या नजीकची शाळा, महाविद्यालय किंवा राज्य शासनाचे कार्यालय, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निधी देता येतो.
- सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) अन्वये करमुक्त आहे. त्यासाठीचे आयकर सुटीचे प्रमाणपत्र आवश्यतेनुसार संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून दिले जाते.
✦ संकल्प एक – योगदान हजारोंचे
तहानभूक विसरुन, कुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊन, वारा पाऊस, थंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन. ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग.. सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त आपल्या सैनिकांना सलाम करुया.. ध्वज दिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावूया..!
लेखन: वृषाली मिलिंद पाटील.
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय
कोल्हापूर

