पुणे:
पुण्यातील सिंहगड रोडवर नव्याने बांधलेल्या राजाराम पुल ते वडगाव बुद्रुक फनटाईम पर्यतचा उड्डाणपूल मेट्रोच्या कामासाठी ६६ ठिकाणी तोडण्यात येणार आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च वाया जाणार असुन वाहतूक कोंडीसह पुल कुमवत व लहान होणार आहे त्यामुळे नियोजित खराडी ते खडकवासला व हिंजवडी ते माणिकबाग या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पर्यायी जमीन उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, मेट्रो साठी या प्रशस्त पुलाची तोडफोड करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाची रुंदी कमी होऊन वाहतुकीची कोंडी पुन्हा गंभीर होणार आहे.
मेट्रोचे खांब उभारण्यासाठी हा बदल आवश्यक करण्यात येणार आहे. ११८ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल ठिक ठिकाणी तोडल्याने पुलाला भगदाडे पडण्याची तसेच वाहतूकीस असुरक्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार कायम उभी राहणार आहे.
पुलाच्या तोडफोडीचा फटका सिंहगड रोड,
वडगाव, धायरी, नऱ्हे , खडकवासला परिसरासह पानशेत, सिंहगड भागातील नागरिकांना व लाखो पर्यटकांना फटका बसणार आहे.
उड्डाणपूलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आले. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
महापालिकेने या बदलासाठी आवश्यक असलेली तरतूद करुन पुलाची उभारणी केली असल्याचे सांगितले जात आहे असे असताना पुलाची ६६ ठिकाणी तोडफोड करण्याची गरज आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे .

