घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ झाल्या…
मुंबई -गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या सावळागोंधळाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. विमाने रद्द आणि तासनतास होणाऱ्या विलंबामुळे हवालदिल झालेल्या प्रवाशांचा संयम आता सुटला असून, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी अक्षरशः राडा घातल्याचे चित्र समोर आले आहे. तीन दिवस उपाशीपोटी ताटकळत राहूनही बॅगा हाती न लागल्याने एका प्रवाशाने विमानतळावर जोरदार राडा घातला.
इंडिगोच्या गलथान कारभाराचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर एका विदेशी महिलेने रागाच्या भरात थेट चेक-इन काउंटरवर चढून थयथयाट केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आणखी एका प्रवाशाचा व्हिडिओ समोर आला आहे. इंडिगोच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशी आपला संयम गमावून बसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओतील हा प्रवासी इंडिगोच्या चेक-इन काउंटरवर जोरजोरात हात आपटून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहे.
हा प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये अडकून पडला होता. उपाशीपोटी आणि कोणताही आधार नसताना कसेबसे मुंबईत पोहोचल्यानंतर त्याची बॅगच बेपत्ता असल्याचे समजले. या प्रवाशाचे म्हणणे आहे की, “आम्ही गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये अडकून पडलो होतो. तिथे आम्हाला अन्नाचा कण नाही की पाण्याचा घोट मिळाला नाही. कसेबसे आज आम्ही मुंबईत पोहोचलो, तर आता आमच्या बॅगाच बेपत्ता आहेत. माझ्या घराच्या चाव्या आणि पासपोर्ट त्या बॅगेत आहेत. आता आम्ही काय करायचं? कुठे जायचं?” असे विचारत या प्रवाशाने संतापाने काउंटरवर हात आपटत कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान, मुंबई विमानतळावर इंडिगोचे विमान रद्द झाल्याने एका विदेशी महिलेने संतापाच्या भरात थेट काउंटरवर चढून कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने तिचा संयम सुटला आणि तिने इंडिगोच्या गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तेथे उपस्थित इतर प्रवासीही फ्लाईटच्या अपडेटसाठी ताटकळत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एकीकडे इंडिगोच्या सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, इतर विमान कंपन्यांनी संधीसाधू भूमिका घेत तिकिटांचे दर दहा पटीने वाढवले आहेत. दिल्ली ते बेंगळुरू विमानाचे मूळ तिकीट दर 7 हजार रुपये आहे, ते आता 1 लाख रुपयांच्या पुढे गेले. दिल्ली ते मुंबई विमानाचे मूळ तिकीट दर 6 हजार रुपये आहे, ते आता 70 हजार रुपयांवर गेले आहे.
प्रवाशांचा होणारा हा छळ आणि खाजगी कंपन्यांची मनमानी लूट पाहून अखेर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान भाड्यांवर मर्यादा घालण्याचे आदेश दिले असून, भाड्याचे ‘रिअल-टाइम ट्रॅकिंग’ सुरू केले आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाढीव दर न आकारण्याच्या सक्त सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

