मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर अडवल्याने आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवी मुंबईतील तुर्भे येथून रिक्षाने आलेल्या अनुयायांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने संतप्त झालेल्या जमावाने पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिय्या देत रस्ता रोखून धरला. यामुळे काही काळ दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा साडे तीन तास खोळंबा झाला होता. अखेर अनुयायांच्या संतापापुढे नमते घेत पोलिसांनी रिक्षांना पुढे जाण्यास परवानगी दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. सकाळपासूनच मुंबईत काही ठिकाण वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नवी मुंबई आणि उपनगरातून अनेक अनुयायी रिक्षाने चैत्यभूमीकडे निघाले होते. मात्र, चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर रिक्षांना प्रवेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी या रिक्षा अडवून धरल्या. यावर अनुयायांनी तीव्र आक्षेप घेतला.
“आम्ही दरवर्षी याच मार्गाने रिक्षाने येतो, तेव्हा अडवले जात नाही. मग यंदाच हा नियम का? आणि जर बंदी होती, तर आम्हाला त्याची पूर्वकल्पना का दिली नाही?” असा जाब विचारत अनुयायांनी पोलिसांशी हुज्जत घातली. ऐनवेळी रस्ता अडवल्याने अनुयायी आक्रमक झाले आणि त्यांनी महामार्गावरच रास्ता रोको सुरू केला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही अनुयायी रिक्षा पुढे नेण्यावर ठाम होते. यामुळे पोलिस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला.
यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी वादावादी झाली. या गोंधळात एका पोलिसाच्या पायावरून रिक्षा गेल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली. दुसरीकडे, अनुयायांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. “रिक्षामध्ये महिला आणि लहान मुले असतानाही 10-15 पोलिसांनी रिक्षेला मागून धक्के मारले. आलिशान गाड्यांना प्रवेश दिला जातो, मात्र गरिबांच्या रिक्षा अडवल्या जातात,” अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली. “आमचा केवळ एकच दिवस महत्त्वाचा आहे, आजच्या दिवशी नियम शिथिल करावेत,” अशी मागणी त्यांनी लावून धरली. शेवटी पोलिसांनी अनुयायांच्या आंदोलनापुढे नमते घेत साडे तीन तासांनतर या रिक्षांना पुढे जाण्यास परवानगी दिली.

