पुणे – खराडीत असलेल्या ‘ए वन स्पा’ सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा मॅनेजर आणि मालकीण अशा दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांना खराडी येथील संभाजीनगरमधील ‘ए वन स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची सत्यता पडताळल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान, स्पा मॅनेजर सुवर्णा संदीप क्षीरसागर (वय ३८, रा. कसबा पेठ, पुणे) आणि स्पा मालकीण अश्विनी परेश कोळेकर (वय ३६, रा. कोंढवा, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघींनी परराज्यातून आणि इतर ठिकाणांहून आणलेल्या पाच महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड झाले. पोलिसांनी या सर्व पीडित महिलांची सुटका केली.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही महिला आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण तसेच तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, भुजबळ, वैशाली इंगळे, रेश्मा कंक आदी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

