पुणे : “समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव मिलाफ सादर करताना भारतीयांचे प्रेम आणि मिळणारा प्रतिसाद पाहून भारावलो आहे. भारतीय प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीच प्रेरणादायी असतो,” अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांनी व्यक्त केली. भारत दौऱ्याच्या निमित्ताने पुण्यात दाखल झाल्यानंतर झुआन ले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अलायन्स फ्राँसेस पुणेच्या संचालिका अॅमेलि वायगेल उपस्थित होत्या.
अलायन्स फ्राँसेस पुणे, फ्रेंच दूतावासाच्या सहयोगाने आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने झुआन ले यांचा बहुप्रशंसित कार्यक्रम ‘रिफ्ले’ शनिवारी (ता. ६) संध्याकाळी ७.३० वाजता कलाग्राम, सिंहगड रोड पुणे येथे पुणेकरांसाठी सादर होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. ‘रिफ्ले’ हा झुआन ले आणि नृत्यांगना शिह-या पेंग यांनी साकारलेला दुहेरी समकालीन नृत्यप्रयोग आहे. यात नृत्य, हिप-हॉप, फ्रीस्टाइल स्केटिंग आणि दृश्यशैली यांचा संमिश्र वापर करून ओळख, स्मृती, संतुलन आणि मानवी संबंध यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण केले आहे.
झुआन ले यांनी सांगितले की, हा त्यांचा भारत दौऱ्याचा दुसरा प्रवास असून स्वत:च्या नृत्यसंस्थेचा पहिलाच दौरा आहे. जयपूर, मुंबई आणि पुणे या शहरांना भेट दिली असून त्यात्या ठिकाणी नृत्य सादरीकरण केले आहे. तसेच फ्रेंच नृत्यसंदर्भात कार्यशाळा घेतल्या आहेत. भारतामधील प्रत्येक शहराचा स्वतःची एक ओळख आहे. प्रेक्षकांची जिज्ञासा, खुलेपणा आणि भावनिक प्रतिसाद कलाकाराला नवी ऊर्जा देतात.” भारतातील कलापरंपरा, कथा आणि मानवी नात्यांमध्ये असलेली विविधता कलाकारांसाठी समृद्ध करणारी असल्याचे सांगत त्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. झुआन ले यांनी १५ वर्षांपासून आययंगार योगाचा सराव करत असल्याचेही सांगितले. या योगप्रकारातील शिस्त, शरीर-भान आणि संतुलन त्यांच्या नृत्यभाषेला आकार देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
अॅमेलि वायगेल यांनी सांगितले की, महानगरपालिकेसोबतच्या सहयोगातून ‘रिफ्ले’ पुण्यात सादर करणे हे इंडो-फ्रेंच सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांना जागतिक दर्जाचा नृत्यप्रयोग मोफत अनुभवता यावा, हा अलायन्स फ्राँसेसचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर प्रभावी प्रकाशयोजना, नेमकी हालचाल आणि ओळख निर्माण करणारे प्रकाशगोळ्याचे दृश्य यांसाठी प्रसिद्ध असलेला ‘रिफ्ले’ हा कार्यक्रम पुणेकरांना संतुलन, हालचाल आणि मानवी नात्यांच्या काव्यमय विश्वात घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

