धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी २० शाळांमध्ये जनजागृती उपक्रम
पुणे : एका कष्टकरी, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबातील मुलाचा आणि दुसऱ्या दारूच्या व्यसनाने त्रस्त कुटुंबातील मुलाचा जीवनप्रवास…दारू पिणाऱ्या वडिलांमुळे बिघडलेले घरगुती वातावरण, तसेच पैशासाठी दुकानात अपमान सहन केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलाची मानसिक घुसमट… पुढे एका सुजाण मित्राने केलेल्या योग्य प्रबोधनामुळे तो मुलगा चुकीच्या मार्गावरून परत येतो आणि शिक्षण-संस्कारांच्या दिशेने वाटचाल सुरू करतो, असा सकारात्मक संदेश पथनाट्यातून देत बाल गुन्हेगारीचे गंभीर परिणाम शालेय विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने पर्वती येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, संजय भैलुमे उपस्थित होते. किशोर साव व विशाल भैलुमे ह्यांनी पथनाट्याचे दिग्दर्शन केले.
प्रमिला गायकवाड म्हणाल्या, मुलांना लहान वयात गुन्हेगारी प्रवृत्तीचे आकर्षण वाटू शकते. यासाठी काही वेळा पालक आणि प्रामुख्याने नेते मंडळी जबाबदार असतात. फक्त मुलांनाच याबद्दल जागृत करून उपयोग नाही पालकांना देखील जागृत केले पाहिजे. मुलांमध्ये संयम आणि ताकद निर्माण करणे गरजेचे आहे.
नंदकुमार गायकवाड म्हणाले, मोबाईल मुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. ती कमी व्हावी यासाठी शासन, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. परंतु आई-वडिलांनी देखील लहान वयात मुलांना मोबाईल देऊ नये. गुन्हेगारीतील मुलांना प्रकाशवाट दाखवण्यासाठी उदय जगताप जे प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहेत, त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल.
डॉ. मिलिंद भोई म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करत आहेत. परमेश्वराची सेवा ही मंदिरामध्ये नाही. समाजामधील गरजूंची सेवा करण्यातच परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची मंदिरे ही केवळ देव देवतांच्या मूर्तींची न राहता समाजसेवेची महा मंदिरे व्हावीत.
उदय जगताप म्हणाले, धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळ हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. पुण्यातील गुन्हेगारी वाढू नये यासाठी आदर्श मित्र मंडळाने पुण्यातील २० शाळांमध्ये प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या असा उपक्रम राबवत आहे. संवाद परिवर्तन यात्रा देखील पुणे शहरात काढण्यात येणार आहे. शहरातील गणेश मंडळे या उपक्रमात मदत करत आहेत. शाळा, समाज आणि पोलीस एकत्र आले तर शहरातील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल.

